मधुमक्षिका ; एक नैसर्गिक देणगी

    03-Jul-2023
Total Views |

madhumakshika
 
 
मूर्ती लहान पण कीर्ती महान, असंच म्हणावं अशी आपली ही मधमाशी. दिसायला अगदी छोटासा जीव असलेली ही माशी, बीज तयार होण्यासाठी, झाडे वाढण्यासाठी आवश्यक असलेल्या परागीभवनाच्या क्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. आकाराने लहान असली तरी आपल्या प्रचंड संख्येच्या बळामुळे त्या मोठ्या प्रमाणावर कार्य करू शकतात. जीवसृष्टीचे अस्तित्व टिकवून ठेवताना झाडांचे महत्त्व आणि गरज किती आहे हे आपण अभ्यासले आहेच. यंदा जो कडाक्याचा उन्हाळा आपण सहन केला त्यावरून लक्षात येतेच की झाडे जर कमी अथवा नष्ट झाली, तर काय होऊ शकते. याची कल्पनासुद्धा भयावह आहे. साधारणपणे मार्च एप्रिलच्या काळात फुलांना बहर येण्याच्या काळात मधमाशा जास्त कृतिशील होतात. या काळात फूलं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात त्यामुळे मधमाशांना अन्नपुरवठा (परागकण आणि मकरंद) मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. परिणामी, नैसर्गिकरित्या मधमाशा वसाहतीचे विभाजन करतात आणि निसर्गातील पोळ्यांची संख्या वाढते.
 
‘लॉकडाऊन’च्या कालावधीत फक्त महिन्याभरात हवा इतकी शुद्ध झाली आणि माणसांचा परिसरातील तसेच गच्चीवरचा वावर कमी झाला अन् मधमाशा पोळ बनवू लागल्या. अशाप्रकारे मानवी वस्तीच्या ठिकाणी केलेल्या पोळ्यांपासून माणसांचे आणि माणसापासून त्या पोळ्याचे रक्षण करण्यासाठी ती पोळी तिथून हलवावी लागतात. तिथल्या मधमाशांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ न देता त्यांना नैसर्गिक अधिवासात पुनर्स्थापित करण्याचे काम मी गेली काही वर्षे करतो आहे. आतापर्यंत अंबरनाथ, विरार, शहापूर, नेरळ, खारघर, विक्रोळी, दादर अशा विविध भागातून काम केले आहे. आत्तापर्यंत एकूण 60 ते 70 पोळं रेस्क्यू केली आहेत. मधुमक्षिका संवर्धक केल्याच्या प्रवासातील एक प्रसंग आठवतो. वलसाड येथील धरमपूरसारख्या गावापर्यंत प्रवास करून मधाचे पोळे मी रेस्क्यू केले आहे. त्याकरिता वलसाड - धरमपूर येथील श्रीमद राजचंद्र मिशन आश्रमातून बोलावणे आले. संपूर्ण वलसाडमध्ये मधमाशांना इजा न पोहोचवता पोळ्याची व्यवस्था करून देणारी कुठलीच यंत्रणा नाही किंवा तत्सम व्यक्ती नव्हती. ज्या आश्रमात हे पोळे लागले होते तिथली माणसं अतिशय धार्मिक स्वभावाची होती. त्यांना त्या मधमाशांना हानी पोहोचवायची नव्हती. तिथल्या एका महिला सेवेकरी यांनी समाज माध्यमावरील एका व्हिडिओवरून माझ्या कामाविषयी माहिती मिळाली आणि त्यांनी मला मधमाशांना सुरक्षितपणे तिथून हलवण्याची विनंती केली. त्यानुसार मी मुंबईहून प्रवास करत वलसाडला त्यांच्या आश्रमात गेलो अन् तिथल एसी डकच्या मागील फ्लोरिआ जातीच्या मधमाशीच पोळं माशांना इजा होऊ न देता काळजीपूर्वक काढल व जाळीमध्ये भरलेल्या मधमाशा लांब अंतरावर सोडून दिल्या.
 

man with madhumakkhichatta 
 
 
जिथे पाण्याचा स्रोत उत्तम आहे, हवा शुद्ध आहे अशा ठिकाणी मधमाश्या पोळ करतात. त्यामुळे ज्या भागात मधमाशीचं पोळ आहे त्या ठिकाणची जैवविविधता उत्तम आहे, असे म्हणता येईल. तिथे असणारी झाडे झुडपे यांचे व्यवस्थित परागीकरण होत आहे, तिथल्या हवेची गुणवत्ता छान आहे, पाण्याचा स्रोत चांगला आहे. वैगरे गोष्टींचा अंदाज या मधमाशीच्या पोळ्यामुळे लावता येतो. जगभरात माशांच्या 20 हजारांहून जास्त प्रजाती अस्तित्वात आहेत. त्यातील फक्त पाच प्रकारातील माशा मधाच पोळ बनवतात. बाकी सर्व एकट्या जगत असतात. त्या मातीमध्ये, खोडामध्ये, सुकलेल्या लाकडामध्ये, दगडाच्या कपारीमध्ये अंडी घालतात व त्यावर परागकण जमा करतात.अशाप्रकारे त्या त्यांची जमात वाढवतात. या अंड्यातून येणार्‍या माशासुद्धा एकट्याच जगतात. पोळ करून राहत नाहीत. आर्टिक आणि अंटार्टिकचा बर्फाळ प्रदेश सोडला, तर मधमाशा जगात सर्व ठिकाणी आढळतात. आपल्या भारतात पोळ करून राहणार्‍या पाचही प्रकारातील मधमाशा आढळतात. म्हणजेच आग माशी, युरोपियन माशी, फुलोरी माशी, सातेरी माशी, ट्रायगोना माशी. मधमाशांच्या कोणत्या प्रजाती दुर्मीळ आहेत वा नामशेष झाल्या आहेत यावर अजूनही खात्रीशीर मत मांडता येणार नाही त्या अनुषंगाने आजतागायत संशोधन सुरू आहे.
 
मधमाशा खरंच त्रासदायक असतात का? किंवा त्या चावल्यास काय करावे?
 
मधमाशा या निसर्गाचा एक भाग आहेत. त्या त्यांचे काम करत असतात. मधमाशी कधीही चावत नाही तर ती डंख मारते. तिच्या पोटाच्या खाली नांगी असते त्याच्या सहाय्याने ती डंख मारते. आयुष्यात हा डंख ती एकदाच मारू शकते. कारण, त्यानंतर ती मरून जाते. माशांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रकार आढळतात. शाकाहारी फुलांचा मधुरस आणि परागकण खाऊन जगतात, तर मांसाहारी माशा म्हणजेच गांधील माशी प्रकारातील माशा किडे, कीटक खाऊन जगतात. या गांधील माशीने केलेला डंख खूप त्रासदायक ठरतो. त्याने काहीही फायदा होत नाही. याउलट इतर प्रकारातील मधमाशीचा डंख (ज्याला स्टिंग म्हणतात) उपयुक्त ठरतो. त्याने संधिवात, लकवा, एचआयव्ही.. सारखे 300 हून जास्त आजार बरे होण्यास मदत होते. माझ्या कुटुंबात आई आणि बहिणीवर मी स्वतः मधमाशीची ‘स्टिंग थेरपी’चा प्रयोग केला आहे. त्याचे चांगले परिणाम त्यांना दिसून आले आहेत.
 

original_honeycomb 
 
 
मधमाशी किंवा गांधील माशीने चावल्यावर काय करायचं?
 
सर्वप्रथम त्या जागेपासून दूर जावे. त्यानंतर तो लागलेला डंख काढून त्यावर शेतातील ओली माती अथवा काळी माती किंवा तुळशीतील माती घेऊन त्याचा जाडसर लेप लावावा. तो लेप सतत ओला राहील याची काळजी घ्यावी. जेणेकरून त्या मातीमध्ये मधमाशीचे सर्व विष शोषले जाऊन होणारा दाह कमी कमी होत जाईल. नुकतेच मी काही पोळ रेस्क्यू केली. बहुतेकांना असे वाटते की, मी सहज मधमाशा स्थलांतरित करतो आणि पैसे कमावतो. परंतु, हे काम करत असताना मलाही काही आव्हानांना सामोरे जावे लागते. काही दिवसांपूर्वी आलेला अनुभव असा की, मुलुंड पूर्वेला दुपारच्या वेळी एक पोळ रेस्क्यू करताना माझ्या पायाला मधमाशीचे सुमारे 20 ते 25 डंख झालेले आहेत. मी नेहमी गंमतीत म्हणायचो, रेस्क्यू करताना मधमाशीचा डंखाची मला सवय झाली आहे वैगरे... परंतु, येथे त्यांनी माझे चांगलेच लसीकरण केले आहे, तर एकदा, ठाण्यातील बोटनीकल गार्डनमध्ये रेस्क्यू करून आणलेल्या मधमाशीच्या पोळ्याची पेटी मी वडाच्या झाडाखाली ठेवलेली होती. मात्र, दुसर्‍या दिवशी वटपौर्णिमा असल्याने तिथल्या काळजीवाहू व्यक्तीच्या सांगण्यानुसार रात्री 11 वाजता जाऊन ती पेटी तिथून स्थलांतरित करावी लागली. थोर वैज्ञानिक आईनस्टाईन यांनी म्हटल्याप्रमाणे, जर पृथ्वीवरून मधमाशा नष्ट झाल्या, तर पुढील चार वर्षांत संपूर्ण मानवजात पृथ्वीवरून नष्ट होईल. कारण, मानवाला लागणार्‍या अन्नधान्य निर्मितीत मधमाशांचा 90-95 टक्के सहभाग आहे. आपण खात असलेल्या अन्नापैकी 1/3 अन्न हे मधमाशा़ंनी परागीभवनाच्या माध्यमातून तयार केलेले असते. यानिमित्ताने आपणही मधमाश्यांचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्याकडे आलेल्या मधमाशा न मारता त्यांना नैसर्गिक अधिवासात पुर्नस्थापित करून एक सुजाण नागरिक असल्याची जबाबदारी पार पाडूया. पर्यावरण संवर्धनात एक खारीचा वाटा उचलूया.
 
- श्री तरे 
(शब्दांकन : कस्तुरी देवरुखकर)