योगींचा दणका! माफिया अतिक अहमदची संपत्ती सरकारजमा

05 Jul 2023 13:03:56
 
yogi
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या योगी सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. योगी सरकार हे माफिया अतिक अहमदची जप्त केलेली मालमत्ता लवकरच सरकारी मालमत्ता म्हणून घोषित करण्याच्या तयारीत आहे. कोट्यवधींची मालमत्ता माफिया अतिकवर गँगस्टर कायद्यातील कारवाईत जप्त करण्यात आली. प्रयागराज पोलिसांनीही यासाठी तयारी सुरू केली आहे. गँगस्टर अॅक्टच्या कलम १६ आणि १७ मधील तरतुदींचा पोलिस आढावा घेत असून, अतिक अहमद आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर घेतलेल्या संपत्तीची लवकरच सरकारी मालमत्ता म्हणून नोंद होईल, असा विश्वास योगी सरकारकडून व्यक्त केला जात आहे.
 
पोलिसांनी आत्तापर्यंत अतिक आणि त्याची पत्नी शाइस्ता परवीन यांच्या नावे ३ अब्ज ४५ कोटी ४७ हजार रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. सरकारने संपूर्ण राज्यात गुन्हेगार आणि भूमाफियांविरोधात विशेष मोहीम राबवली होती. याअंतर्गत माफिया अतिक अहमदच्या गुन्ह्यातून हस्तगत केलेल्या सुमारे २० मोठ्या मालमत्ता गँगस्टर कायद्यातील कलम १४(१) अंतर्गत जप्त करण्यात आल्या आहेत. पीपल गाव, झालवा, सिलना भिटी, दामोपूर, कासारी मासारी, चकिया, पुरमुफ्ती, झुशी, फुलपूर, सिव्हिल लाइन्स, लुकेर गंज, जसनसेन गंज, रोशन बाग, कौशांबी, धुमानगंज, प्रयागराज येथे अतिकची मालमत्ता आहे.
 
लखनौमध्येही अनेक मौल्यवान जमिनी आणि बांधकाम केलेले भूखंड गँगस्टर कायद्यांतर्गत जप्त करण्यात आले आहेत. माफिया अतिकची मौल्यवान जमीन आता सरकारच्या अखत्यारीत आल्यास सरकारला मोठा फायदा होणार आहे. या जमिनींवर सरकार गरिबांसाठी घरबांधणी योजना सुरू करू शकते किंवा जनतेच्या फायद्यासाठी इतर योजना करू शकते. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येनंतर अतिकची पत्नी शाइस्ता फरार असताना, यूपी सरकार या माफियांवर सातत्याने कारवाई करत आहे.
Powered By Sangraha 9.0